पेन्शनधारकांचे प्रश्न जलगतीने मार्गी लागणार
ठाणे जिल्हा परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय
ठाणे दि. २५ : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक सर्व लाभ वेळेवर प्रदान केले जावेत तसेच पेन्शनधारकांचे विविध प्रश्न जलगतीने मार्गी लावण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘पेन्शन अदालत’ आयोजित केली जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जिल्हा परिषदेने विविध विधायक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले.
पेन्शनधारकांना वेळेत पेन्शन मिळावी यासाठी ठाणे जिल्हा परिषद नेहमी आग्रही राहिली आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पेन्शन हा मुख्य आर्थिक आधार असतो. त्यामुळे पेन्शनधारकांना मिळणारी पेन्शन आणि त्यासंदर्भातील विविध लाभ वेळेत मिळणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेता पेन्शनधारकांची कोणतीही समस्या अथवा तांत्रिक प्रश्नांचे वेळेत आणि जलदगतिने निराकरण होण्याच्या दृष्टीने पेन्शन अदालत हा उपक्रम महत्वाचा आहे.
२ डिसेंबरला होणार पहिली अदालत
गुरुवार २ डिसेंबर २०२१ रोजी पहिली पेन्शन अदालत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १०. ३० वाजता संपन्न होणार आहे. पेन्शनधारकांनी कोविड१९ चे सर्व नियंत्रण नियम पाळून शिबिरास उपस्थित राहायचे आहे. तसेच दरमहाच्या पहिल्या गुरुवारी ही पेन्शन अदालत असली तरी ज्या गुरुवारी शासकीय सुट्ठी असेल त्या लगतच्या दिवशी म्हणजे पहिल्या शुक्रवारी पेन्शन अदालत भरवली जाणार आहे.
लेखी म्हणणे मांडण्याचे आवाहन!
पेन्शनधारकांचा प्रश्न वेळेत मार्गी लागणे हा पेन्शन अदालातचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पेन्शन धारकांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडल्यास प्रश्नावर उचित कार्यवाही करणे प्रशासनास सोईचे होईल त्यामुळे पेन्शनधारकांनी आपले म्हणणे लेखी मांडण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.