डोंबिवली ( शंकर जाधव ) : ड्रग्ज प्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडितेची आई ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होती. त्याचा फायदा घेत मी तुझ्या आईचा जामीन मिळवून देतो, असे अमिष दाखवून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रदीप भास्कर बेहरा नामक 24 वर्षीय बलात्काऱ्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या संदर्भात मुंबईतील मानखुर्द भागात राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने दिलेल्या जबानीवरून कोळसेवाडी पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी भादंवि कलम 376, 376 (3) सह बालकांवरील लैंगिक अत्याचारांचे अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी प्रदीप हा कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या एका ढाब्याच्या बाजूला असलेल्या इमारतीत राहतो. तर मानखुर्द भागात राहणारी ही महिला ड्रग्जप्रकरणी न्यायालयीन कोठडीत अर्थात जेलमध्ये होती. ही महिला जेलमधून बाहेर आल्यानंतर तिच्या 14 वर्षीय मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला सांगितली. प्रदीपने आईला जामीन देण्याचे या मुलीला आश्वासन दिले. 30 ऑक्टोबरच्या रात्री त्याने त्या निष्पाप मुलीला कल्याण पूर्वेतील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती सदर महिलेने मानपाडा पोलिसांना दिली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी पसार झाला. कसोशीने शोध घेत असतानाच आरोपी प्रदीप पोलिसांच्या तावडीत सापडला. कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.