डोंबिवली ( शंकर जाधव ) : सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी मिलापनगर तलाव जवळ झाडाची सुकलेली मोठी फांदी महावितरणच्या हायटेंशन वायरवर पडली.त्यामुळे मोठा कानठळ्या बसवणारा आवाज येऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. याबाबत महावितरणला तातडीने कळविल्यानंतर कर्मचाऱ्यांनी येऊन सदर झाडाची फांदी हायटेंशन वायरपासुन बाजूला केली.
काही दिवसांपूर्वीच महावितरणने निवासी भागात दोनदा मोठा शटडाउन घेऊन हायटेन्शन वायरला लागणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या होत्या.परंतु त्यावेळी अनेक रहिवाशांनी त्यांचा घराजवळील फांद्या हायटेंशन वायरला लागत असल्याचा तक्रारी केल्या होत्या. येथील जागरूक महिला विधीशा जठार यांनी याबाबत लिखित व तोंडी पाठपुरावा महावितरण अधिकाऱ्यांकडे सतत केला होता. या घटनेमुळे तासभर वीज पुरवठा बंद झाला होता. त्यानंतरही अधूनमधून वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना व नोकरदारांचे ऑनलाईन कामे यात अडथळा निर्माण होत आहे. महावितरणने रहिवाशांचा तक्रारी नुसार कार्यवाही करावी अन्यथा अशा घटना पुन्हा होऊ शकतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते असे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी सांगितले.