विश्व

कृषी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्यदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. 7 :- राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषी, आरोग्य, शिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वर्षा निवासस्थानी मुंबईतील अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात कृषी, सायबर सुरक्षा, सौरऊर्जा, उत्पादन आधारित उद्योग, गुंतवणूक, जागतिक दर्जाचे शिक्षण या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले, राज्य शासनाने कृषी, शिक्षण, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान, ऊर्जा, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई मेट्रो, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधांमुळे औद्योगिक गुंतवणुकीस चालना मिळत आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जमीन सिंचनाखाली आणताना कृषी क्षेत्राला बळ देण्याचे काम करण्यात येत आहे. शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असून जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कृषी, सायबर सुरक्षा, सौरऊर्जा, जागतिक दर्जाचे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करून महाराष्ट्रासोबत दीर्घकालीन संबंध जपण्यासाठी प्रयत्न करू, असे श्री. हॅंकी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री. हॅंकी यांनी हिंदीतून मुख्यमंत्र्यांशी अधून मधून संवाद साधला. त्यांच्या हिंदीला दाद देत ‘तुम्ही मुंबईत राहून लवकरच मराठी शिकाल’, असे मुख्यमंत्र्यांनी श्री. हँकी यांना सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!