गुन्हे वृत्त मुंबई

अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त

मुंबई, दि.12 : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई या ,”उत्पादक” अन्न आस्थापनातून दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी हळद पावडर (वजन 296 किलो), धनिया पावडर (वजन 3998 किलो), मिरची पावडर (वजन 6498 किलो), जीरे पावडर (वजन 5454 किलो) तसेच करी पावडर (वजन 2498 किलो) असा एकूण रुपये 27 लाख 39 हजार एवढ्या किमतीचा अन्नपदार्थाचा साठा तो गैरछापाचा व कमी प्रतीचा असल्याचा संशयावरून जप्त करण्यात आला.

अन्न आस्थापनातून एकूण पाच अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने उचित कायदेशीर कारवाई घेण्यात येईल.  सदरची कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांचे आदेश व अभिमन्यु  काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. ही कार्यवाही  राहुल ताकाटे, अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे यांनी  अशोक पारधी, सहाय्यक आयुक्त (अन्न), ठाणे यांचे उपस्थितीत केलेली आहे.

खाद्यतेल उत्पादकांनी टिनांच्या डब्यांचा खाद्यतेलाच्या पॅकिंग करण्यासाठी पुनर्वापर करू नये, कोणत्याही खाद्यतेलाचे पॅकिंग करताना विहित दर्जाच्या बी. आय. एस. ग्रेडच्याच टीनाच्या डब्यांचा उपयोग करावा, खाद्यतेलाच्या सर्वांगीण व सर्वंकष तपासणी व विश्लेषणासाठी स्वतःची अद्यावत इन हाऊस (अंतर्गत) प्रयोगशाळा ठेवावी. कोणत्याही खाद्यतेलाची लूज, सुट्ट्या किंवा खुल्या स्वरूपात विक्री करू नये. अन्नपदार्थ हाताळणीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक कामगारांचे ते संसर्गजन्य रोग आणि किंवा त्वचारोग यापासून मुक्त आहेत याची खात्री व खातर जमा होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. “मिठाई” याअन्नपदार्थाच्या किरकोळ विक्रेत्यांनी सुट्ट्या स्वरूपातील मिठाईच्या ट्रेवर सदर मिठाई कोणत्या तारखेपर्यंत वापरावी याबाबतचा स्पष्ट उल्लेख नेहमी करावा.

प्रत्येक उत्पादकाने उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व्यक्तीची नेमणूक करावी. तसेच अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी 25 कामगारामागे एका व्यक्तीला अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत फास्टट्रॅक ट्रेनिंग प्राप्त करून घ्यावे. जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाद्यतेला व्यतिरिक्त इतर उत्पादकांनी त्यांनी विक्रीसाठी उत्पादित केलेल्या प्रत्येक अन्न पदार्थाचे बॅच निहाय तपासणी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी प्राधिकृत केलेल्या एन. ए. बी. एल. प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी. प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाने बिलावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत त्याला मंजूर करण्यात आलेला परवान्याचा क्रमांक न चुकता नमूद करावा तसेच सदरचा परवाना सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फोटो फ्रेम करून लावावा.

उत्पादक, आयातदार, वितरक यांनी कोणत्याही अन्नपदार्थाची विनापरवाना किंवा विनानोंदणी अन्न आस्थापकडून खरेदी करू नये किंवा विनानोंदणी किंवा विनापरवाना अन्न आस्थापनांना कोणत्याही अन्नपदार्थाची कोणत्याही परिस्थितीत विक्री करू नये. प्रत्येक अन्न व्यवसायाचालकाने त्याच्या दुकानात व परिसरात अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायाचा परवाना व नोंदणी) 2011 अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण स्वच्छता राखावी तसेच कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जा बाबत आणि किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन ठाणे अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (अन्न), सुरेश देशमुख यांनी केलेली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!