मुंबई

सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विशेष विकास निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 22 : सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विकास निधी, वांग मध्यम प्रकल्प, कोयना भूकंपग्रस्तांच्या वारसांना दाखले देणे आदी विविध विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली. डोंगरी भागातील तालुक्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.मंत्रालयात झालेल्या या बैठकीस उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई, कोरेगाव, खटाव व खंडाळा हे आठ पूर्णगट तालुके तसेच माण, फलटण, कराड हे तीन उपगट तालुक्यांचा डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत समावेश होतो. वित्त विभागाकडून त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येत असून विशेष निधी देण्याची मागणी मंत्री श्री. देसाई यांनी केली. त्यावर हा निधी देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने पूर्ण करून त्याबाबतचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवावा. डोंगरी विभाग विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.कोयना भूकंपग्रस्तांच्या वारसांना भूकंपग्रस्त दाखले तातडीने देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पाटण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या वाढीव कामासाठी निधी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!