ठाणे

कल्याण, वसई आणि वाशी येथे एकाच दिवशी ४०३ वीजचोरांवर धडक कारवाई..२३६ विशेष पथकांच्या महामोहिमेत कारवाईचा शॉक

डोंबिवली ( शंकर जाधव ) :   महावितरणच्या कल्याण, वाशी आणि वसई मंडलात मंगळवारी (२२ नोव्हेंबर) एकाच दिवशी १७०० कर्मचाऱ्यांच्या २३६ विशेष पथकांनी तब्बल १३ हजार ७९८ वीज मीटरची तपासणी करून वीज चोरांविरुद्ध महाकारवाई केली. यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार वीजचोरी करणाऱ्या ४०३ तर कलम १२६ अन्वये अनधिकृत वीजवापर करणाऱ्या १६२ जणांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. वीजचोरीला प्रतिबंध व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अचूक वीजबिल या उद्देशाने पोलिस आणि सुरक्षारक्षकांच्या मदतीने आखलेल्या या महामोहिमेत महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.

कल्याण व भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते दीपक पाटील, राजेशसिंग चव्हाण आणि राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर ही कारवाई करण्यात आली. कल्याण मंडल एक अंतर्गत हाजीमलंग वीजवाहीनीवरील भाल, वसार, द्वारली, नेवाळी, धवलपाडा, पालेगाव व घारपे परिसरात ५८८ कर्मचाऱ्यांच्या ७६ पथकांनी एकूण ७ हजार २६१ वीजजोडण्यांची तपासणी केली. यात १५१ ठिकाणी वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. याशिवाय सिल तुटलेले व संशयास्पद असे २३७ वीजमीटर सापडले. तसेच ७४ ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले.
वाशी मंडलातील वांगणी वीजवाहिनीवरील वांवजे, देवीचा पाडा, खेरना, चांदरान, तोंद्रे, पाले खुर्द परिसरात ५०० कर्मचाऱ्यांच्या ९८ पथकांमार्फत ३ हजार ९८५ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात ५३ ठिकाणी वीजचोरी तर २४ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. तर ४५ ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले.

वसई मंडलातील धुमाळ नगर वीजवाहिनीवरील धानीव, गावदेवी मंदिर परिसर, शांतीनगर, नवजीवन, मिल्लत नगर, गांगडेपाडा, राशिद कंपाऊंड, जाधव पाडा भागात ६१० कर्मचाऱ्यांच्या ६२ पथकांनी २ हजार ५५२ वीजजोडण्यांची तपासणी केली. यात १९९ ठिकाणी वीजचोरी तर १३८ जणांकडून विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळले. तसेच १७ ग्राहकांकडील नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले.

वीजचोरी आढळलेल्या ठिकाणी वीजचोरीचे अनुमानित देयक व तडजोडीची रक्कम भरण्याची नोटिस बजावण्यात येत आहे. या रकमेचा मुदतीत भरणा न करणाऱ्यांविरुद्ध कलम १३५ नुसार गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. तर अनधिकृत वीजवापर प्रकरणी कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणतीही युक्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये; अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!