ठाणे, दि. 13 : मकर संक्रांत सणा निमित्त ठाणे शहरात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा काही ठिकाणी नायलॉन दोऱ्याचा असल्याचे निदर्शनास आले आहे. नायलॉन मांजामुळे अपघात होत असल्याने पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजासाठी नायलॉन दोरा व ज्या मांजास काचेची कोटिंग आहे त्याची विक्री, साठा व वापरावर ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत दि. 15 जानेवारी 2023 ते दि.31 जानेवारी 2023 या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, अशी माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्तालयाने यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहे. त्यात म्हटले आहे की, मकर संक्रांत सणाच्या निमित्त पंतग उडविण्याचे प्रकार जास्त प्रमाणात असते व मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा, काचेचा वापर करण्यात आलेला धागा यांचा वापर होतो. पतंग उडविताना तसेच दोन पतंगामध्ये पेच झाल्याने (दोऱ्याचे) घर्षण होऊन मोठया प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतीमध्ये अडकतो. त्यामुळे वन्य पशुपक्ष्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊन वन्य पशुपक्षी जखमी होण्याचे व प्राण गमविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पतंगाच्या मांज्यामुळे रस्त्यावरून जाणारे दुचाकी वाहनावरील स्वार, शाळेतील विद्यार्थी व पतंगाच्या मागे धावणारे मुले / इसम इत्यादी यांचा अपघात होऊन त्यात ते जखमी होणे व जिवितहानी होणे असे प्रकार या मांजामुळे घडू शकतात. नायलॉनचा मांजा लवकर तुटत नाही व त्याचा नाशही होत नाही. तो पर्यावरणास हानिकारक ठरत आहे.
यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. 15 जानेवारी 2023 ते दि.31 जानेवारी 2023 या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून अशा मांजावर बंदी घालण्यात आली आहे, असे या आदेशा म्हटले आहे.