पुणे, ता 2 (संतोष पडवळ) : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल हाती आला असून भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसने मोठा धक्का दिलाय. कसब्यात महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झालेला आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव झालेला आहे.
कसब्यात मतमोजणीच्या अगदी सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आघाडीवर राहिले. केवळ एखाद-दुसऱ्या फेरीचा अपवाद वगळता हेमंत रासने यांना एकदाही रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेता आली नाही. विशेष म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधून कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जास्त मते मिळाली. कसब्यातून आलेला निकाल हा अनपेक्षित असल्याची भावना व्यक्त करण्यात येतेय. हा एक ऐतिहासिक विजय असल्याची भावना कसबाकरांची आहे. धंगेकर यांनी 11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेतून भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली, मात्र याची रवींद्र धंगेकरांना पराभूत करण्यासाठी मदत झालेली नाही. तसंच कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठमध्येही रासनेंना मतं मिळाली. पण ती सुद्धा रवींद्र धंगेकर यांना टक्कर देऊ शकली नाहीत. सकाळपासून सुरू ठेवलेली आघाडी अखेर विजयात रूपांतर झाली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात काँग्रेसने झेंडा फडकावल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.