ठाणे दि.24, :- मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ते सुरक्षेसंदर्भात माहिती व्हावी, यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया या कंपनीच्या वतीने प्रशिक्षण व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात संस्थेतील सुमारे 250 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
होंडा कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील जावरकर यांनी रस्ता सुरक्षितता व रस्त्यावरील सुरक्षिततेची चिन्हे या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधून मार्गदर्शन केले. संस्थेतील एकूण 250 विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या समारोपात मोटर वाहन प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. विजय शेळके यांनी विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. अपघात कसे टाळता येतील व दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलू नये, वळण रस्त्यावर हात दाखवणे, इंडिकेटरचा वापर करणे, वाहन चालवण्याचे लायसन्स बाळगावे, सीट बेल्टचा वापर करणे या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. शेळके यांनी केले.
सहाय्यक वाहन निरीक्षक संदीप येडे, संतोष मुलाके आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. आर. महाजन यांनीसुद्धा विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. परिवहन कार्यालयाच्या वतीने डॉ. विजय शेळके यांनी प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव केला. कार्यक्रमाचे नियोजन यंत्र अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख एस. डी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत अभियांत्रिकीचे अधिक्षक जे. डी. नाई) व भौतिकशास्त्राचे अधिक्षक बी. जे. चौधरी यांनी केले.