डोंबिवली ( शंकर जाधव ) : टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ किलांबी पंकजा वल्ली ( पंकजा दीदी) यांना मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पंकजा दीदी गेली सुमारे २७ वर्षे जम्मू काश्मीर मध्ये अदिती सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहेत. स्मृतिचिन्ह, मानपत्र व ₹ ५१,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
टिळकनगर विद्यामंदिर पटांगणात आयोजित सोहळ्यात पंकजादीदी यांची मुलाखत ‘ हम’ संस्थेच्या नंदिनी पित्रे यांनी घेतली. मागील २७ वर्षांचे जम्मू मधील आपले अनुभव पंकजा दीदींनी प्रेक्षकांसमोर मांडले. दहशतवाद जेव्हा टोकाला पोहोचला होता त्याचे सर्व समाजावर परिणाम झालेच परंतु त्यातही महिला आणि लहान मुले हे सर्वात जास्त पीडित आहेत,असे त्यांनी सांगितले. ३७० आणि ३५ A रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे असेही त्या म्हणाल्या.”व्यवसायाभिमुख शिक्षण, आरोग्य व महिला सबलीकरण यातील अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा,” असे आवाहन या निमित्ताने पंकजा दीदींनी उपस्थितांना केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान समारंभामध्ये लोकमान्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ‘जयोस्तुते’ हे गीत सादर केले.पुरस्कार प्रदान समारंभाच्या पूर्वी डोंबिवलीतील विविध रोटरी क्लबचे सदस्य तसेच शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांच्याशी पंकजा दीदी यांनी संवाद साधला व त्यांना अदिती सेवा प्रतिष्ठानच्या कार्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशीर्वाद बोंद्रे यांनी केले. पंकजा दिदींचा विस्तृत परिचय अर्चना जोशी यांनी करून दिला. यावेळी रिद्धी करकरे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली तर कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी आभार प्रदर्शन केले.