दिवा : गणेश पाडा येथून दातीवली समांतर रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारावरील स्लॅब तुटल्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे तोल जाऊन वारंवार अपघात घडत होते. या संदर्भात गणेश पाड्यातील मनसेचे शाखाध्यक्ष सुशांत तांडेल आणि मनविसे शाखाध्यक्ष धनेश पाटील यांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. याप्रकरणी दिवा प्रभाग समिती कार्यालयात शहर सचिव प्रशांत गावडे आणि विभाग सचिव परेश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी संपूर्ण गटार नवीन बांधण्यात येणार असून त्याची फाईलही मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते.
पण दरम्यानच्या काळात गटारावरील स्लॅब मोठ्या प्रमाणात तुटल्यामुळे त्यात अडकून दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची संख्या वाढत गेली. याबतीत मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी ट्विटर च्या माध्यमातून ठाणे महापालिकेकडे पुन्हा तक्रार केली, तसेच होणाऱ्या अपघातांचे सीसीटीव्ही विडिओ सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांना पाठवून दिले. त्यानंतर काम सुरू करण्यासाठी खडी आणि भुसा आणून टाकण्यात आला पण प्रत्यक्षात कामाला मात्र सुरवात करण्यात आली नाही.
काल एका दिवसात ३ अपघात झाल्यानंतर तुषार पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना हे विडिओ पाठवून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर तात्काळ तात्पुरता स्वरूपात अपघात टाळण्यासाठी तिथे नवीन झाकणं आणून टाकण्यात आली.
काल मनसे आमदार राजू पाटील हे दिवा शहरातील कामांचा आढावा घेण्यासाठी दिव्यात आले असताना शहर अध्यक्ष तुषार पाटील, शाखाध्यक्ष सुशांत तांडेल आणि धनेश पाटील यांनी हा विषय आमदार राजू पाटील यांच्या निदर्शनास आणून देऊन कशाप्रकारे महापालिका प्रशासन काम करण्यास चालढकल करीत आहे याची माहिती दिली.
यावर आमदार राजू पाटील यांनी काल तात्काळ संबंधित गटाराचे काम सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते आणि आज दिनांक १९ मे २०२३ पासून या गटाराच्या कामाला महापालिकेकडून कामाला सुरुवात करण्यात आली.