नवजात बालकांची खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना अटक
डोंबिवली ( शंकर जाधव ) : पोलीस अधिकाऱ्यांनी खूप महिन्यांच्या नियोजन पूर्वक मेहनतीने नवजात बालकांची खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली. डोंबिवली महिला महासंघा तर्फे पोलीस प्रशासनाचे आभार आणि अभिनंदन करण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांना सर्वात जास्त शिक्षा मिळेल आणि गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून ही संघटित गुन्हेगारी मुळापासून संपवता येईल असा आशावाद महिला महासंघाने व्यक्त केला आहे.
डोंबिवली महिला महासंघा तर्फे एका शिष्टमंडळाने मंगळवारी उल्हासनगर पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी महासंघातर्फे अध्यक्ष डॉ. विंदा भुस्कुटे, कार्यवाह जयश्री कर्वे, सदस्य ॲडवोकेट तृप्ती पाटील, सदस्य आणि पोलीस मित्र राजश्री पाजनकर, सदस्य संगीता देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना निवेदन देऊन या केसमधील आरोपींना मोक्का कायदा लावण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी 370, 34, 80, 81 आदि कलमे लावली असून महासंघाने केलेला अभ्यास आणि इतर माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये डॉक्टर्स, त्यांचे सहाय्यक, बेळगावची व्यक्ती, नाशिकमधील काही महिला असे वेगवेगळ्या प्रांतातील अनेक व्यक्ती संघटितपणे गुन्ह्या मध्ये सामिल आहेत. त्यामुळे या केसला महाराष्ट्र मोक्का कायदा लावावा असे निवेदन महासंघाने म्हटले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांना सर्वात जास्त शिक्षा मिळेल आणि गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून ही संघटित गुन्हेगारी मुळापासून संपवता येईल असे मत महिला महासंघातील सदस्यांनी व्यक्त केले आहे.