मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 4.69 टक्क्यांनी अधिक लागला आहे. तर दिव्यांग श्रेणीत 93 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी दोन वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करून प्रिंटही काढू शकणार आहेत.
बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये
- 14,16,371 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे. त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत, म्हणजेच, राज्याचा निकाल 91.25 टक्के
- पुनर्परिक्षार्थि ( रिपीटर ) निकालाची टक्केवारी : 44.33 टक्के
- खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 82.39 टक्के
- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 93.43 टक्के
राज्यातील नऊ विभागांपैकी सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा
- राज्यातील नऊ विभागांपैकी सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा 96.01 टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 88.13 टक्के
- राज्यातील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.73 टक्के तर मुलांचे प्रमाण 89.14 टक्के.
- मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा 4.59 टक्क्यांनी जास्त
- एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के
मागीलवर्षी राज्याचा निकाल 94.22 टक्के, तर यंदा निकाल 91.25 टक्के
मागीलवर्षी राज्याचा निकाल 94.22 टक्के होता. यावेळी तो 91.25 टक्के आहे. म्हणजेच, मागीलवर्षी पेक्षा यावर्षीचा निकाल 2.97 टक्क्यांनी कमी आहे. मात्र कोरोना आधीच्या म्हणजेच, फेब्रुवारी-मार्चमध्ये निकालापेक्षा यावेळचा निकाल 0.59 नं अधिक आहे. त्यावर्षी निकाल 90.66 टक्के लागला होता.
बारावी निकालाची विभागनिहाय आकडेवारी
- पुणे : 93.34 टक्के
- नागपूर : 90.35 टक्के
- औरंगाबाद : 91.85 टक्के
- मुंबई : 88.13 टक्के
- कोल्हापूर : 93.28 टक्के
- अमरावती : 92.75 टक्के
- नाशिक : 91.66 टक्के
- लातूर : 90.37 टक्के
- कोकण : 96.25 टक्के