गुन्हे वृत्त ठाणे

ठाण्यात 22 लाखांच्या गुटख्यासह एका आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

 ठाणे, (२५जुलै, संतोष पडवळ) : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह २२ लाख रुपयाचा गुटखा ठाण्यात जप्त करण्यात आला, याप्रकरणी एकाला अटक कऱण्यात आली आहे. हि कारवाई ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून कऱण्यात आली आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची गुजरात राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात मुंबईसह ठाणे, नवीमुंबईत गुटख्याची मागणी वाढली असून या शहरामध्ये गुटख्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी घोडबंदर रोड या ठिकाणी गुजरात येथून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोनि. संजय शिंदे, विकास घोडके, सपोनि. पोपट नाळे, पोउनि. रमेश कदम आणि पथक यांनी घोडबंदर रोड, स्कायलाईन आर्केड इमारत या ठिकाणी सापळा रचून संशयितरित्या येणाऱ्या आयशर टेम्पोला थाबवून टेम्पोची तपासणी केली असता त्यात विमल गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलीस पथकाने टेम्पोचालकासह गुटख्याने भरलेला टेम्पो ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात सुमारे २२ लाख रुपये किमतीचा गुटखा सापडला.

हा गुटखा मुंबईतील शिवाजी नगर येथे गोदामात जाणार होता, तेथून मुंबईतील लहान मोठे दुकानदाराना काळ्याबाजारात त्याची विक्री होणार होती अशी माहिती अटक कऱण्यात आलेल्या चालकाच्या चौकशीत समोर आली असल्याची माहिती वपोनि. कोथमिरे यांनी दिली. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!