ठाणे

रिक्षाचालक महिलेला मद्यपींची बेदम मारहाण – दिव्यात संतापजनक प्रकार

दिवा, ता. 18 (बातमीदार) : एकीकडे महिलांना रिक्षा व्यवसायात उतरवण्यासाठी ‘अबोली’ योजना राबवली जात असताना या रिक्षाचालक महिलांच्या सुरक्षेला धक्का देणारी घटना रविवारी रात्री 8.15 च्या सुमारास दिवा येथे घडली. रस्त्याच्या मधून चाललेल्या मद्यपींना रिक्षाचालक महिलेने जागा देण्यास सांगितले. त्यावर संतप्त होऊन मद्यपींनी रिक्षाचालक महिलेला शिवीगाळ आणि बेदम मारहाण केली. तसेच रिक्षाची तोडफोड केली.
रिक्षाचालक महिला दिवा टर्निंग परिसरातील रस्त्यावरून प्रवाशांना घेऊन रिक्षा चालवत होती. रिक्षात लहान मुलदेखील होते. येवले चहाच्या दुकानासमोर रस्त्याच्या मधून चाललेल्या तिघांना रिक्षाचालक महिलेने हाॅर्न वाजवून बाजूला होण्याचा इशारा केला. मात्र दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी तिला जागा देण्याऐवजी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर बेदम मारहाणही केली. मद्यपींना रोखण्यासाठी आतील प्रवासी पुढे गेले असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तसेच रिक्षाच्या दर्शनी भागाची काच फोडण्यात आली. याप्रकरणी दिवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने अबोली रिक्षाचालक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!