दिवा : रविवारी दुपारी दिवा मनसे शहर सचिव यांना एका महिलेचा कॉल आला की, माझ्या मुलीला दिड महिना झालं शाळेत बसू देत नाहीयेत, तिची परीक्षा जवळ आली आहे कृपया मदत करा.या अनुषन्गाने दिवा मनसे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी विषय समजून घेतला तेव्हा समजलं की इयत्ता १ली ला पालकांनी मुंब्रादेवी कॉलनी मधील न्यू गुरुकुल शाळेत प्रवेश घेतला होता पण आर्थिक परिस्थितीमुळे फि भरणे शक्य नसल्याने त्यांनी, ठाणे महापालिका शाळेत मुलीला इयत्ता २री च्या वर्गात टाकले. पण पूर्वीच्या शाळेकडून दाखला घेऊन या असे महापालिका शाळेने पालकांना सांगितले.
पालकांनी गुरुकुल शाळेने थकीत असलेली १३ हजारांची फी कमी करून ७ हजार पालकांना भरण्यास सांगितले. पण दाखला देताना त्यावर जातीचा उल्लेख करण्यासाठी त्यांच्याकडे वडिलांचा जातीचा दाखला मागितला. पालकांनी वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध नसल्याने आईचा जात दाखला देण्याची तयारी दर्शवली. पण शाळेच्या कारकुनांनी त्यांना वाडीलांचाच जात दाखला पाहिजे हे सांगून मुलीचा दाखला दिला नाही. या सर्व बाबी नीट समजून घेतल्यानंतर दिवा मनसे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष कुशाल पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्या ताईंना सांगितलं की मंगळवारी तुम्ही मुलीला शाळेचा गणवेश घालून सोबतच घेऊन या, तिला आम्ही शाळेत बसवूनचं बाहेर पडू असा सूतोवाच केला.
शाखाध्यक्ष सागर निकम, उपशाखाध्यक्ष गुणाजी सावंत यांना सोबत घेऊन शहर सचिव प्रशांत गावडे यांनी महापालिका शाळा गाठली. शाळेच्या उपमुख्याध्यापकांशी चर्चा केल्यानंतर कुशाल पाटील यांनी त्यांना शासनाच्या नियमांची नीट माहिती करून दिली. आणि मुलीला तात्काळ वर्गात बसू देण्याची विनंती केली. शिक्षकांनी तात्काळ मुलीला शाळेत बसविण्याचे मान्य केले. दिड महिन्यानंतर ही चिमुकली आपल्या वर्गात आल्यानंतर आपल्या वर्गातील मुलांना बघून तिचे डोळे भरून आले.
तदनंतर गुरुकुल शाळेत मनविसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील यांच्या मुद्देसूद प्रश्नांमुळे शाळेने आईचे जात प्रमाणपत्र ग्राह्य धरून बुधवार सकाळी १२.०० वाजेपर्यंत तात्काळ शाळा सोडल्याचा दाखला देण्याचे मान्य केले. या सर्व प्रकरणात त्या मुलीला मात्र दिड महिना शाळेपासून वंचित राहावे लागले. शाळा प्रशासनाने किमान मुलांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे इतकीच माफक अपेक्षा यावेळी दिवा मनसे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी व्यक्त केली आहे.