डोंबिवली ( शंकर जाधव ) : कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना चव्हाण यांनी निर्देश दिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. एनडीए चारशे पार होण्यासाठी युतीधर्माचे पालन करून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडून आणायचे आहे. निवडणुकीच्या कामाला लागा असे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्देश दिले.
पूर्वेकडील ब्राम्हणसभा येथे बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली विधानसभा क्षेत्र भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चव्हाण यांनी सांगितले की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला सुरुवात करा. शिंदे यांची निश्चित हॅट्रिक होईल. कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव एनडीएचे उमेदवार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता कामाला सुरुवात करा. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोठा उत्साह आहे.