ठाणे : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून 'ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबई आणि डॉ. राजेश मढवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अक्षर चळवळ प्रकाशन यांच्या सौजन्याने 'थोडं तिच्या मनातलं' या विषयावर निमंत्रित कवयित्रीचे कविसंमेलन ध्यास चे अध्यक्ष प्रसिद्ध कवी संदेश भोईर यांच्या संकल्पनेतून १० मार्च रोजी मराठी ग्रंथसंग्रहालय, गोखले रोड, ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात एकूण तीस कवयित्री निमंत्रित केल्या होत्या. या कवीसंमेलनाच्या अध्यक्षा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष सौ. नमिताताई कीर या होत्या.
काव्यमैफिलीची सुरूवात 'ध्यास कवितेचा काव्यमंच'च्या सदस्य स्नेहाराणी गायकवाड यांच्या प्रास्ताविकाने झाली त्यांच्या संस्थेतर्फे होणाऱ्या निरनिराळ्या उपक्रमांची माहिती देऊन आज महिलादिनानिमित्त सर्व कवयित्रींना आपापल्या मनातलं काव्यरूपात मांडण्यासाठी आमंत्रित केल्याचं त्या म्हणाल्या.
कवयित्री सुनीता काटकर यांनी 'तुझे स्वप्न मला पडले' कवितेची सूरमय सुरूवात केली. तर माधुरी बागडे यांनी 'आता नाही पेलवत रे तुझी गुलामी' अशी तक्रार मांडली. स्वाती शिवचरण यांनी
सारे पहातात तिला ओरडताना, चिडतानापण कुणीच पहात नाही तिला सहन करताना
असं स्त्रीचं दुःख मांडलं. तर संध्या लगड यांनी 'एक लाट तरी परतवून लावावी लागेल' अशी दमदार कविता मांडली. रजनी निकाळजे यांनी 'आत खोलवर शोध घेते स्वतःचा' असा स्त्रीचा प्रवास मांडला. अक्षता गोसावी यांनी 'उंबरठ्याच्या आत असलेली बाई लपवते डोळ्यातील पाणी' अशी स्त्रीची करुण कहाणी सांगितली.
'स्त्री जळत असते पण तिच्यातलं तेल कधीही संपत नाही' अशी एक धारदार ओळ या कविसंमेलनात ऐकायला मिळाली. मेघना साने यांनी 'स्त्रीच्या हृदयाची उंची वेगवेगळीच असते, नात्यातल्या प्रत्येक पुरूषासाठी' असे स्त्रीच्या मनातील गुपित सांगितले.
दीपा ठाणेकर यांनी स्त्रीच्या आशा आकांक्षांचं कसं बाष्पीभवन होतं ते सांगितलं, सुप्रिया हळबे पुरोहित हिने कवितेतून एक सत्य मांडलं. 'जगभर करिती गजर देवीचा पण स्त्रीला किंमत नाही.'
स्त्रियांच्या कवितेतून कधी स्त्रीचा दबलेला आवाज फुटून येत होता तर कधी घामानं भिजलेलं शरीर आणि ओघळलेलं कुंकू दिसत होते. कधी नारी भरारी घेत होती तर कधी प्रश्न घेऊन लढत होती.
आजची स्त्री करियरिस्ट असली आणि यशाची शिखरे पादाक्रांत करीत असली तरी तिला स्नेहाची, साथीदाराची गरज असते. काही कवयित्रींनी 'मला त्याची गरज आहे' हे आपल्या कवितेतून कबूल करून टाकले. स्नेहाराणी गायकवाड यांनी आपल्या कवितेतून 'जगून घे तू आता थोडं तिच्या मनातलं' अशी स्त्रीची प्रियकराकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली भारती वार्डेकर यांनी "सांग रे तू तिच्या अंतरंगात डोकावलास कधी...?!
तिला केवळ यंत्र समजलास माणूस म्हणून जगवलंस कधी..?...असा धमकी वजा इशाराच आपल्या कवितेतून दिला अखेरच्या कवितेत संगीता काळबोळ यांनी 'त्याच्याशिवाय जगणं अशक्य आहे' आणि पुनर्जन्म मिळेल व त्याची पुन्हा भेट होईल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी 'ध्यास कवितेचा काव्यमंचा'तर्फे होत असलेल्या सर्व उपक्रमांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, " प्रेम ही समजून घेण्याची गोष्ट आहे. विवाहानंतर स्त्री दुसऱ्या घरात जाते. पण तेथील माणसांचं प्रेम समजून घेतलं, त्यांना आपलं मानलं तरच ते कुटुंब आपलं होतं. नाहीतर स्त्री तिथे रमू शकत नाही." विवाहित मुले मुली विभक्त होण्याचं प्रमाण हल्ली वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आपण आत्मपरीक्षण करावं, मी पणा सोडून आम्ही वर जोर द्यावा म्हणजे जीवन सोपे होईल असा कानमंत्र दिला.
कार्यक्रमाच्या अखेरीस 'अक्षर चळवळ'चे संस्थापक सुप्रसिद्ध लोककवी अरूण म्हात्रे यांनी इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य इत्यादी विख्यात साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपली 'तुला पाहिले मी फुले वेचताना' ही कविता सादर केली. त्यावेळी सर्व कवयित्री मंत्रमुग्ध झाल्या.