कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या जयराम कवटे (५२) या शिपायाचा सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुरबाड तालुक्यातील सुरोसेपाडा चौकात घडली. या दुर्घटनेत कवटे यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
मुरबाड तालुक्यातील कामतपाडा परिसरात राहणारे कवटे पालिकेत नोकरीला लागल्या पासून मागील २५ वर्षे लेखा विभागातच कार्यरत होते. मार्च महिन्यात अचानक त्यांना अर्धाग वायूचा झटका आल्याने त्यांनी उपचार घेतले होते. प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर १५ दिवसात त्यांनी या गंभीर आजारावर मात केल्यानंतर १ एप्रिल पासून पुन्हा कामावर रुजू होण्याची त्यांनी परवानगी घेतली होती. नेहमी एसटीने मुरबाड ते कल्याण प्रवास करणाऱ्या कवटे यांना कामावर पहिला दिवस असल्याने मुलगा आपल्या चारचाकी गाडीने सोडण्यासाठी निघाला होता. त्यांच्या वाहनाला सुरोसे पाडा येथे एका बसने धडक दिली या अपघातात चालका शेजारी बसलेले जयराम यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या मागे २ मुले, १ मुलगी, पत्नी असा परिवार आहे. कवटे यांच्या अपघाती मृत्युचे वृत्त कळताच पालिकेतील कर्मचार्यांनी हळहळ व्यक्त केली