कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई
गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला ,कल्याण पोलिसांनी केलं गजाआड
डोंबिवली ( शंकर जाधव ) : देशभरात शंभरहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले.हा चोरटा गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला होता.कोळशेवाडी पोलिसांनी चोरट्याला पकडून गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामविलास उर्फ रामा गुप्ता असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
रामा काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांच्या ताब्यातून निसटला होता. रामविलास गुप्ता या चोरट्याच्या शोधात सहा राज्याची पोलिस होती . कल्याण नजीक एका ढाब्यावर रामविलास आला असल्याची माहिती कोळशेवाडी पोलिसांना मिळाली होती. अवघ्या बारा मिनिटात ढाबा गाठत कोळशेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले.
गुजरात पोलिस रामविलास गुप्ता या आरोपीला ठाण्यात एका तपासानिमित्त 10 एप्रिल रोजी ठाणे नगर येथे घेऊन आले होते . या दरम्यान पोलिसांना गोंगारा देत रामविलास गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. उत्तर प्रदेशात राहणारा रामविलास गुप्ता याच्यावर देशभरात शंभरहुन अधिक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, दिल्ली आंध्र प्रदेश या राज्यात तो अनेक गुन्ह्यात फरार आहे. हा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याने त्याच्या शोधात अनेक पोलिस पथके काम करीत होती. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांना पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी दिनकर पगारे यांनी रामविलास बद्दल माहिती दिली.
कल्याणचे डिसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिनकर पगारे यांचे पोलिस पथक कल्याणनजीक म्हारळ परिसरातील एका ढाब्यावर पोहचले. रामविलास त्याठिकाणी कोणाच्या तरी प्रतिक्षेत बसला होता. पोलिसांनी रामविलास याला चारही बाजूंनी त्याला घेरले. पोलिस कर्मचारी सुशील हांडे, सचिन कदम अन्य सात पोलिसांनी रामविलास याच्यावर झडप घातली. रामविलासला ताब्यात घेतले. त्याला पुन्हा गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रामविलासने चोरी केलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात एक मोठा बंगला बांधला आहे. दुचाकी आणि चार चाकी ढिगभर गाड्या आहे. हा चोरटा पकडला गेल्याने पोलिासांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.