कल्याणात नेते संजय राऊत प्रचारात
कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी मंगळवार 16 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत नेवाळी लगतच्या गोरपे गावात आले होते. या रॅलीत उमेदवार वैशाली दरेकर, नेते संजय राऊत व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड दिसल्या. संजय राऊत, वैशाली दरेकर आणि सुलभा गायकवाड हे वाहनात एकत्र येत असताना कार्यकर्त्यांनी जेसीबीची पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. मात्र कल्याणमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. त्याचवेळी कल्याण लोकसभेसाठी मोठा राजकीय भूकंप म्हणून याकडे पाहिले जात आहे. याआधीही 9 तारखेला गुढीपाडव्याला कल्याणात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह सुलभा गायकवाड या मेळाव्यात उपस्थित होत्या. मंगळवारी दरेकर यांच्या प्रचाराकरता नेते संजय राऊत आले असता दरेकर व सुलभा गायकवाड या एकत्र दिसल्या. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी वैशाली दरेकर यांना पाठिंबा दिला आहे का ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.