मुंबई दि.१८ : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात पुणे येथील सारथी संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यामध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ६, नाशिक जिल्ह्यातून ५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे, अशी माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.
सारथी संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. सारथीमार्फत युपीएससीकरिता लाभ घेऊन यश मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांची रँक क्रमांक व नावे पुढीलप्रमाणे :
१२२ विनय सुनील पाटील (नाशिक), १४७ आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), २२४ ठाकरे ऋषिकेश विजय (अकोला), २५८ शामल कल्याणराव भगत (पुणे), २६७ उन्हाळे आशिष विद्याधर (बुलडाणा),२८७ निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (पुणे), ३०८ घोगरे हर्षल भगवान (पुणे), ३५९ शुभम भगवान थिटे (पुणे), ३९५ अंकित केशवराव जाधव (हिंगोली), ४१४ खिलारी मंगेश पराजी (अहमदनगर), ४९६ पाटील लोकेश मनोहर (जळगाव), ५३१ मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), ६०४ आविष्कार विजय डेले (नाशिक), ६१० केतन अशोक इंगोले (वाशिम), ६२२ देशमुख राजश्री शांताराम (अहमदनगर), ७०६ निकम सुरज प्रभाकर (नाशिक), ७३२ कुणाल संजय अहिरराव (नाशिक), ७५९ गौरी शंकर देवरे (पुणे), ८३७ शुभम उत्तमराव बारकाळे(नाशिक), ९७६ श्रावण अमरसिंह देशमुख (सातारा), हे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत यशस्वी झाले आहेत.
मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले आहेत.