शालेय विद्यार्थ्यांनी रॅली तसेच चित्रकला,निबंधलेखन या सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
पातलीपाडा येथील महानगरपालिका शाळा क्रमांक २५,५३ व ५४ येथे चुनाव पाठशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी चुनाव पाठशाळा मध्ये प्रत्यक्ष मतदान कक्षाचे प्रारूप तयार करुन त्याबाबत सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी शाळेच्या माध्यमातून मतदान जनजागृती करीता विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती. "मतदार राजा जागा हो"!लोकशाहीचा धागा हो"! चला मतदान करुया, देशाची प्रगती करुया"। 'एक दोन- तीन- चार मतदारांचा जयजयकार ! 'अशा घोषवाक्याचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या . या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी,शिक्षकवर्ग व पालकवर्ग सहभागी झाले होते.
तसेच शाळेतील परिसरात पथनाट्य सादर करून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. निवडणूक मतदानाचे महत्व या विषयावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, घोषवाक्य लेखन यांसारख्या स्पर्धा शाळेमध्ये घेण्यात आल्या. पालकांचे मतदान करण्याबाबतचे आई-वडिलांस पत्रही विद्यार्थ्यांनी लिहले. मतदान प्रक्रियेचे महत्व आणि स्वरूपाबाबत सहशिक्षिका चंद्रिका पालन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षकवर्ग,कर्मचारीवर्ग आणि पालकवर्ग यांनी निर्भय व नि:पक्षपाती मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
सदर मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.