ठाणे दि. २५ - राज्यातील पाच टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २० मे रोजी २०२४ रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी उद्या दिनांक २६ एप्रिलपासून नामनिर्देशन अर्ज दे
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्या कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दिले जाणार असून त्या दृष्टीने नामनिर्देशन अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली असून अधिकारी कर्मचारी देखील सज्ज झाले आहेत. आज या सर्व यंत्रणेचा आढावा जिल्हाधिकारी तथाजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी घेतला.
दिनांक २६ एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक ३ मे २०२४ असून नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक ४ मे रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक ०६ मे २०२४ अशी आहे. शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४, रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४ व बुधवार दिनांक १मे २०२४ महाराष्ट्र दिन या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही जिल्हाधिकारी तथाजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये 16 मार्च 2024 ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.06 जून 2024 पर्यंत) प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, त्यानुसार निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिनगारे यांनी लागू केले आहेत.