वॉशिंग्टन US on Iran : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इराणविरोधातील कोणत्याही आक्रमक कारवाईत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. इराणनं शनिवारी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केली होती. इस्रायलच्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेनं इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रं यशस्वीरित्या रोखल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात झालेल्या संभाषणात, इस्रायलची पुढील प्रतिक्रिया अनावश्यक होती, असं त्यांनी म्हटलंय.
इस्रायली पंतप्रधान आणि बायडेन यांच्यात फोनवर बोलणं : इस्रायली पंतप्रधानांशी झालेल्या फोन कॉलमध्ये बायडेन म्हणाले की, "शनिवार हा विजय मानला पाहिजे. कारण इराणचे हल्ले मोठ्या प्रमाणात अयशस्वी झालं होते. त्यामधून इस्रायलची उच्च लष्करी क्षमता प्रदर्शित झाली.", अमेरिकेच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार अमेरिकेनं मूल्यांकन केलं की इस्रायलमध्ये कोणतंही मोठं नुकसान झालं नाही. तत्पूर्वी शनिवारी इराणनं इस्रायलवर केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्याचा समर्थन केलं. त्यात म्हटलंय की, " सीरियातील वाणिज्य दूतावासावरील हल्ल्याचं प्रकरण बंद मानलं जाऊ शकतं. इराणनं अमेरिकेला इस्रायलशी सुरु असलेल्या संघर्षापासून दूर राहण्यास सांगितलं. इस्रायलनं 'आणखी एक चूक' केल्यास त्याचं उत्तर अधिक गंभीर असेल, असा इशाराही दिला.
आम्ही जबाबदारीनं काम करत आहोत : इराणच्या न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी मिशननं सोशल मीडियावर "हे प्रकरण बंद मानले जाऊ शकते" असं पोस्ट केलं. मात्र, इस्रायली राजवटीनं दुसरी चूक केल्यास इराणची प्रतिक्रिया तीव्र असेल. इराण आणि दुष्ट इस्रायली राजवट यांच्यातील हा संघर्ष आहे. ज्यापासून अमेरिकेनं दूर राहावं! इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांनी सांगितलं की, "इराणच्या हल्ल्यानंतर त्यांच्या देशाला युद्ध नको आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अनेक जागतिक नेत्यांशी बोलत आहेत. इराणच्या कृतीला प्रतिसाद म्हणून मित्र देशांशी चर्चा करत आहेत. आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करत आहोत. आम्ही शांत मनानं आणि स्पष्टतेनं काम करत आहोत, असंही ते म्हणाले. अध्यक्ष हर्झोग पुढं म्हणाले, 'मला वाटतं की आम्ही अत्यंत केंद्रित पद्धतीनं आणि अतिशय जबाबदारीनं काम करत आहोत. मला खात्री आहे की त्यानुसार निर्णय घेतला जाईल ज्यामुळं आम्ही इस्रायलच्या लोकांचं संरक्षण करु शकतो.
अविश्वसनीय यश : याआधी रविवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, "व्यापक नुकसान रोखण्याची क्षमता हे इस्रायलच्या लष्करी श्रेष्ठतेचं प्रदर्शन आहे. इराण ही लष्करी शक्ती नाही, याचा पुरावा आहे. हे एक अविश्वसनीय यश होते. जे खरोखरच इस्रायलची लष्करी श्रेष्ठता तसंच त्यांची राजनैतिक श्रेष्ठता सिद्ध करते. या प्रदेशात त्यांचे मित्र आहेत. त्यांना जगभरातील मित्र आहेत. जे त्यांना मदत करण्यास तयार आहेत."