नागपूर : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने भिवंडीमध्ये उमेदवार परस्पर जाहीर केलाय. तर सांगलीमध्ये उबाठा गटाने उमेदवार दिल्यामुळे आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर झालेली नाही. आज सांगली आणि भिवंडीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. भिवंडी लोकसभा पारंपरिक काँग्रेसची जागा आहे. ९ वेळा काँग्रेस निवडून आली आहे. आताही काँग्रेससाठी पोषक वातावरणचं आहे. राष्ट्रवादीला सोडलेल्या जागेचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करण्यासाठी आलो असल्याचं दयानंद चोरघे यांनी सांगितलं आहे.
भिवंडी ही कॉंग्रेसची जागा : दयानंद चोरघे म्हणाले की, भिवंडी लोकसभेची माहिती देण्यासाठीचं आज नाना पटोले यांची भेट घेतली आहे. भिवंडी विषयी माहिती दिली. भिवंडी लोकसभा पारंपरिक काँग्रेसची जागा आहे. इथे 9 वेळा काँग्रेस निवडून आली आहे. आताही काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे. पक्षाचे अध्यक्ष जो आदेश देतील तो मानावा लागेल.
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करू - दयानंद चोरघे: पाचव्या टप्प्यात भिवंडी लोकसभेची निवडणूक आहे. ३ मे पर्यंत वरिष्ठ निर्णय घेतील. माझी तयारी आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, अपक्ष फॉर्म भरावा जो आदेश देतील तो पाळणार आहे. कोकण टप्प्यातील निवडणुकीला अजून खूप दिवस बाकी आहेत. २७ किंवा २८ ला कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी फॉर्म भरणार आहे.
शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावा - दयानंद चोरघे: परंपरागत भिवंडी ही काँग्रेसची आहे. या जागेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बसावे आणि पुनर्विचार करावा. मी शरद पवार यांना विनंती करतो की, आम्हाला आशीर्वाद द्या आणि काँग्रेसला लढू द्या, असं चोरघे म्हणाले.
आघाडीत तडजोड तर करावी लागतेच- नाना पटोले : शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटासोबत आमची आघाडी झालेली आहे. आघाडीमध्ये सर्वांच समाधान होत नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मैत्रीमध्ये किती ताणायचा असाही प्रश्न असतोच. महाविकास आघाडीचा जागावाटप जाहीर झालाय. मात्र, महायुतीत किती भयावह मारामारी आहे, हे सर्वांसमोर आहे. आम्ही तर कामालाही लागलो आहोत. श्रीकांत शिंदेंची जागा फडणवीस यांना जाहीर करावी लागते, याच्या वरून महायुतीतलं भांडण लक्षात येते, असं नाना पटोले म्हणाले.