पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वडगाव परिसरात एका खासगी प्रवाशी बसला आग लागल्याची घटना घडलीय. या बसमध्ये ३६ प्रवाशी होते, हे प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळालीय. बसला आग लागल्याचं लक्षात येताच बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं, यामुळे कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायर फुटल्यामुळे बसला आग लागली आणि त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. भारतीय राखीव बटालियन (IRB) चे गस्त पथक, अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि वडगाव मावळ वाहतूक पोलिसांनी बसची आग आटोक्यात आणली.
नाशिकमध्ये धावत्या एसटी बसने घेतला अचानक पेट
नाशिक जिल्ह्यातील मोहदरी घाटात एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. शनिवारी रात्री ८ वाजता मोहदरी घाटात नाशिक-सिन्नर बसला आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये १० प्रवासी होते. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर डेपोच्या एसटी बसने अचानक पेट घेतला. या लागलेल्या आगीत बसमधील केबीन जळून खाक झाली. तर चालकाने प्रसंगावधन राखल्याने प्रवासी आगीतून बचावले.
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बसने घेतला पेट
पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक दरम्यान खासगी लक्झरी बसला भीषण आग लागली होती. या बसचा टायर फुटल्यामुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आलं होतं.