तुषार पाटील यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (RTO) पत्राद्वारे केली मागणी
दिवा ( विनोद वास्कर ) : दिवा शहरातील जवळपास ९०% वाहतूक व्यवस्था हि रिक्षा वाहतुकीवर अवलंबून आहे. सुरवातीपासूनच दिव्यात शेअर रिक्षा पध्द्तीनुसार भाडे आकारणी केली जात आहे. नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियन कडून वाढवण्यात आले. ज्याची अंमलबजावणी दिनांक २१ एप्रिल २०२४ पासून करण्यात आलेली आहे. रिक्षा युनियन कडून करण्यात आलेल्या या दरवाढीला सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला विरोध हा सामाजिक माध्यमांवरून दिसून येत आहे. वास्तविक पाहता दिवा शहरातील मुख्य लोकवस्ती हि साधारणपणे दिवा रेल्वे स्थानकापासून अडीच ते तीन किलोमीटर च्या पट्यात पसरलेली आहे. उदा. दिवा स्टे. ते आगासन फाटक (२.७ किमी), दिवा स्टे. ते बेडेकर नगर (२.१ किमी), दिवा स्टे. ते गणेश नगर (१.९ किमी), दिवा स्टे. ते ग्लोबल शाळा (१.६ किमी) दिवा स्टे. ते दातिवली फाटक (१.७ किमी), दिवा स्टे. ते विठ्ठल मंदिर-दातिवली (१.५ किमी), दिवा स्टे. ते साबे जीवदानी मंदिर (१.० किमी) .
प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) ने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मिटर नुसार रिक्षा वाहतुकीचे भाडे पहिल्या दिड किलोमीटर साठी २३ रुपये आकारले जाते. त्यानुसार जर साबे-जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळे पर्यंतचे अंतर हे अनुक्रमे १ किमी आणि १.६ किमी आहे. नवीन दरानुसार साबे-जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळेपर्यंत १५ रुपये दर करण्यात आला आहे. तीन सीट प्रमाणे त्याचे मूल्यमापन केल्यास रिक्षाचालकला साधारणपणे ४५ रु. मिळतात. मार्च २०२० लॉकडाऊन पूर्वी ग्लोबल शाळेकडून दिवा स्टेशनसाठी सीटमागे प्रत्येकी १० रुपये आकारले जात होते. पण शासनाने त्यावेळी परिस्थिती अनुरूप रिक्षा मध्ये फक्त दोन प्रवासी बसवण्याची सक्ती केली होती म्हणून रिक्षा चालकांकडून १० रुपयांच्या ऐवजी १५ रुपये आकारण्यास सुरवात करण्यात आली. नागरिकांनीही त्यास विरोध केला नाही कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. पण काळानुरूप जेव्हा परिस्थिती सामान्य होऊन पूर्वीप्रमाणे रिक्षा प्रवासी संख्या सुरू करण्यात आली; तेव्हा मात्र रिक्षाचे वाढवण्यात आलेले भाडे तसेच ठेवण्यात आले असे मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
डोंबिवली स्टेशन पासून रिजेन्सी अनंतम गेट पर्यँत साधारण २० रुपये शेअर ऑटो चे भाडे आकारले जाते. किलोमीटनुसार पाहायला गेल्यास हे अंतर अंदाजे ३ किलोमीटर आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर दिव्यातील शेअर ऑटोचे दर देखील आकारले गेल्यास दिव्यातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच इतर शहारांप्रमाणे दिव्यातही मिटर नुसार रिक्षा सेवा सुरू करण्यास वाहतूक विभागाने पुढाकार घेतल्यास त्याचा फायदा रिक्षा चालक आणि प्रवासी दोघांनाही होऊ शकेल. ज्यांना शेअर भाडे जास्त वाटत असेल ते मिटर प्रमाणे रिक्षा वापरू शकतील. तरी प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा युनियन आणि प्रवाशांशी चर्चा करून यावर सर्वसहमत असा मार्ग काढण्याची मागणी दिवा मनसे कडून करण्यात आली आहे.