ठाणे, दिवा ता २६ एप्रिल ( संतोष पडवळ - प्रतिनिधी ) : शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिर्यादी नफीस अहमद सिद्वीकी रा. मुंब्रा, ठाणे यांचा शिळ डायघर परिसरात बांधकाम व्यवसाय असुन आरोपी प्रसादकुमार उत्तम भालेराव वय ३३ वर्षे, रा. डायघर गाव, ता. जि.ठाणे याने फिर्यादी व इतर शिळ डायघर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना आरोपी प्रसादकुमार याने तो फॉरेस्ट अधिकारी असल्याचे सांगुन फिर्यादी व त्यांचे इतर बांधकाम व्यावसायिक यांचे चालू असलेल्या बांधकाम विरूद्व फॉरेस्ट कार्यालय येथे तकार करून व माहितीचा अधिकाराचा दुरउपयोग करून फिर्यादी व इतर बांधकाम व्यवसायिक यांचेकडुन वेळोवेळी पैसे वसुल केले होते.
आरोपीने फॉरेस्ट ऑफिस व इतर कार्यालयात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी वन टाईम सेटलमेंट करिता फिर्यादी व त्यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र यांचेकडुन दिनांक २३/०४/२०२४ रोजी ७,६०,०००/ रू.ची खंडणीची मागणी केली होती. यापैकी ०५ लाख ६० हजार रूपये स्विकारंतांना आरोपी प्रसादकुमार उत्तम भालेराव यास खंडणी विरोधी पथक तसेच विशेष कृती दल यांनी सापळा रचून दि. २५/०४/२०२४ रोजी दोस्ती बिल्डींग, खान कंपाउंड शिळगाव, ठाणे परिसरात रंगेहात पकडले आहे. आरोपी प्रसादकुमार याचेकडुन खंडणीची स्विकारलेली रक्कम व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. ८७४/२०२४ भा.दं.वी.क.३८४,३८५,३८७,५०६ (२),१७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.