कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील आंबिवली ते मुरबाड या नवीन रेल्वे लाईन टाकण्याच्या कामास, भू संपादनास, आणि जमीन मोजणीस मानिवली गावातील काही शेतकऱ्यांचा विरोध कायम असून आज येथील सर्वे वेळी शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची परिस्थिती निर्माण होत असतानाच कल्याण तालुका पोलिसांची शिष्टाई फळाला आली आणि विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमीन न मोजण्याच्या सूचना देण्यात आल्याने परिस्थिती निवळली.
कल्याण(आंबिवली) मुरबाड या नवीन रेल्वे लाईन टाकण्याच्या कामाची मोजणी सुरू आहे. परंतु आम्हांला रेल्वे किंवा भूमि अभिलेख, बांधकाम अशा कोणत्याही विभागाने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करून मानिवली गावातील सुनील गायकर, चंद्रकांत गायकर, विलास गायकर, भालचंद्र गायकर, रुपेश गायकर, व्दारकानाथ गायकर, आदी५०/६०शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मौजे मानिवली येथील सन ११२,१०६,१०४,१०१'वगैरे मधील सुमारे१९७०गुंठे जमीन बाधित होत आहे,२०घरे,२५००फळझाडे, आणि३५शे जंगली झाडे यांची कत्तल होणार आहे. विशेष म्हणजे उल्हास नदीच्या बाजूने सरकारी जागा उपलब्ध असताना आमचे जीवन, आयुष्य का उध्वस्त करत आहेत असा प्रश्न उपस्थित करून रेल्वे अधिनियम१९८९कलम२०(डि)(१)नुसार कल्याण(आंबिवली)मुरबाड नवीन रेल्वे लाईन साठी भू संपादन, आणि वापरास, मोजणीस तीव्र विरोध करत असल्याचे पत्र देऊनही त्याचे कोणत्याही प्रकारचे उत्तर न देता आज रेल्वे निर्माण, बांधकाम विभागाच्या उप अभियंता शुंभागी पाटील व त्यांचे सहकारी मानिवली येथे जमीन मोजणी आले असता वरील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला व मोजणी थांबली, यावेळी काही शेतकऱ्यांनी मात्र आमचा विरोध नसल्याचे सांगितले त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली.
अशातच रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी, तलाठी, मोजणीचे कर्मचारी, आणि बांधकाम च्या शुंभागी पाटील यांच्या गोंधळाची भर पडली, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न देऊ शकल्यामुळे वातावरण ऐन कडाक्याच्या उन्हात अधिकच तापले.
यावेळी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि जिंतेद्र ठाकूर, पीएसआय पाखरे, गोपनीय कक्षाचे संदिप मुंडे, आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले त्यांनी शेतकरी ,मोजणी अधिकारी व ग्रामस्थ यांची बाजू, भूमिका ऐकून घेतली, यावेळी मोजणी व रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांचा भोंगळ कारभार समोर आला, तसेच मोजणीचे काम राणे नामक त्रयस्थ कंपनी ला दिल्याचेही समोर आले, याप्रसंगी परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस अधिकारी जिंतेद्र ठाकूर यांनी ज्या शेतकऱ्यांचा या नवीन रेल्वे लाईन च्या कामी भू संपादन व मोजणीस विरोध आहे, त्यांच्या जमीनी न मोजण्याच्या सूचना उप अभिंयता शुंभागी पाटील यांना देण्यात आल्या तसेच ज्यांचा विरोध नाही, अशा शेतकऱ्यांच्या जमीन मोजा असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी देखील शांत झाले. आणि आप आपल्या जागेत उभे राहिले, हे सर्वांना मान्य झाल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे येथे पोलिसांची शिष्टाई फळाला आली असे म्हणायला हरकत नाही.
याबाबत शेतकरी सुनील गायकर यांनी सांगितले की, आम्हांला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही, यामुळे आम्ही बेघर होणार असून आमचे जीवन उध्वस्त करून कसला विकास करता, तूम्हांला पर्यायी जागा असताना आमच्या शेतकऱ्यांच्या घरावर नांगर का फिरवता, या विरोधात माझ्या सह ५०/६०शेतकरी आम्ही कादेशीर लढाई लढणार आहे असे त्यांनी सांगितले.