दिवा - ठाणे महानगरपालिका हद्दीतील मौजे आगासन गावात महानगरपालिकेने टाकलेल्या विविध सेवा सुविधांच्या आरक्षणाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी सभा घेऊन विरोध कायम दर्शवला आहे.
मंगळवारी आगासन गावात भूमी अभिलेख विभागामार्फत आरक्षित भूखंडाची शासकीय जमीन मोजणी होणार होती. परंतू शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात घेतलेल्या हरकतींमुळे सदर मोजणी रद्द झाली.
मंगळवारी घेतलेल्या सभेत शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकण्यात आलेली आरक्षण रद्द करावीत व पर्यायी सरकारी किंवा इतर जागांचा विचार करावा अशी मागणी ग्रामस्थांनी स्थानिक आमदार राजू पाटील तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी फोन द्वारे संपर्क करून कायम ठेवली आहे.
आगासन गावातील ३० वर्षापूर्वीची राहती घरे व खाजगी शेत जमिनींवर आरक्षण ठाणे महापालिकेने टाकल्या विरोधात मंगळवारी पुन्हा सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रसार माध्यमांसहित आगासन गावातील जवळपास 200 पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी या आरक्षणाला ठामपणे विरोध दर्शविला आहे.
सर्व लोकप्रतिनिधी, खासदार व मुख्यमंत्री महोदयांनी सदर आरक्षण रद्द कण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी ग्रामस्थानी ठामपणे मांडली आहे.