निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
ठाणे, दि. 28 - 24-कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी दि. 04 जून 2024 रोजी डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज मतमोजणी प्रक्रियेसंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.
कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया डोंबिवली येथील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण आज सावित्रीबाई फुले कला मंदिरात घेण्यात आले. मतमोजणी केंद्रातील प्रवेशाचे स्थान यापासून मतमोजणी केंद्राची रचना, मतमोजणी टेबलांची रचना, पोस्टल बॅलेटची मतमोजणी व इतर मतमोजणी प्रक्रियेबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी अत्यंत ओघवत्या व सुलभ शब्दात तसेच सादरीकरण व प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देवून मार्गदर्शन केले.
मतमोजणीच्या दिवशी सकाळी 07.00 वाजता सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणी केंद्रात स्थानापन्न व्हावे, तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई आहे, अशा सूचनाही श्रीमती सातपुते यांनी यावेळी दिल्या.
यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदनिर्देशित अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते आणि सहाही विधानसभा मतदारसंघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.