मतदारात निरुत्साह ; त्यातच शेवटच्या अर्ध्या तासासाठी वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम
उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : मावळ -३३ लोकसभा मतदार संघासाठी १३ मे २०२४ रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी मतदारात निरुत्साह दिसत होता. सकाळी ७ :०० वाजता सुरू झालेल्या मतदानाच्या वेळी उरण विधानसभा - १९० मतदार संघातील उरण शहरात तुरळक तर उरण, पनवेल व खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात मतदार मतदानासाठी केंद्रावर पोहचले होते. पहिल्या तीन तासात अवघे ५ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी ३:०० वाजेपर्यंत २९ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५ :००मतदान करण्याच्या शेवटी उरण विधानसभा -१९० मतदार संघात एकूण सरासरी ५५.०५ टक्के एवढे मतदान झाले.
मावळ -३३लोकसभा मतदार संघात एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे होते.मात्र या मतदार संघातील खरी लढत मागील १० वर्षे मावळ लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले विद्यमान खासदार श्रीरंग चंदू बारणे (शिवसेना शिंदे गट)निशाणी धनुष्यबाण आणि पिंपरी - चिंचवड महानगर पालिकेचे माजी महापौर संजोग विकू वाघिरे पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )निशाणी मशाल यांच्यातच झाली आहे. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आत्ता मतदान यंत्रात शिलबंद झाले असून,आत्ता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यासाठी यासाठी पुढील ३ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जून २०२४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
यावेळी मतदार आणि कार्यकर्ते यांच्यात निरुत्साह दिसत होता.मंद गतीने मतदानासाठी मतदार मतदान केंद्रावर जाऊन कोणत्याही प्रकारे गडबड न करता रांगेतच मतदानासाठी उभे असतांना दिसत होते. याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपक्रम राबविले. यात युवकांसाठी खास सेल्फी आणि सजविण्यात आलेले मतदान केंद्र ही उभारण्यात आले होते.तर सायंकाळी ४:३० वाजताचे सुमारास संपूर्ण उरण मतदार संघात उत्तरेकडून वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाल्याने काही प्रमाणात घाबराटीचे वातावरण निर्माण झाल्याने सायंकाळी मतदानासाठी जाणाऱ्या नागरिकांनी घरातून बाहेर न पडणे पसंत केले.त्यामुळे शेवटच्या अर्ध्या तासात काही प्रमाणात मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
एकूणच मावळ -३३ लोकसभा मतदार संघातील ३४४- मतदान केंद्रामध्ये नवीमुंबई पोलिस उपायुक्त परिमंडळ - २,पनवेलचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आधिपत्त्याखाली मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्याच प्रमाणे मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही अधिक खबरदारी घेतल्याने कोरकोळ प्रकार वगळता संपूर्ण उरण विधानसभा मतदार संघात या मावळ -३३ मतदार संघातील १८ व्या लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहिती उरण विधानसभा -१९० चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसिलदार डॉ.उद्धव कदम यांनी दिली आहे.