माध्यम प्रतिनिधी, अभ्यासक, विश्लेषकांना उपयुक्त नाशिक जिल्हा संदर्भ पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
मे ०१, २०२४
नाशिक, दिनांक १ मे, २०२४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमिवर उपजिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, नाशिकच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नाशिक जिल्हा संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज या संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व मान्यवरांच्या उपस्थितीत हस्ते आज संपन्न झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संदर्भ पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, तहसीलदार शाम वाडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा संदर्भ पुस्तिका लोकसभा निवडणक वार्तांकन करणारे सर्व प्रकारचे माध्यम प्रतिनिधी, अभ्यासक व विश्लेषकांना उपयुक्त व मोलाची ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुक संदर्भातील वार्तांकन करतांना माध्यमांना मागील निवडणुकीचे संदर्भ वेळोवेळी लागतात. या पुस्तिकेत विविध स्वरुपाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 1951 ते 2019 या कालावधीतील निवडणुकीतील विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते, मतदानाशी निगडीत आकडेवारी, जिल्ह्यातील महत्त्वाचे अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, पुरुष व महिला मतदार, मतदान केंद्र, आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे, माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची कार्यपद्धती, पेड न्यूज, प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे आदि माहिती समाविष्ट करण्यात आली आहेत.
या पुस्तिकेची संकल्पना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची आहे. त्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह (भा. पो. से), विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे मार्गदर्शन लाभले. या संदर्भ पुस्तिकेच्या निर्मितीसाठी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, नाशिक विभागाचे उपसंचालक (माहिती) ज्ञानोबा इगवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
संदर्भ पुस्तिकेचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी केले असून, माहिती संकलन व संपादनासाठी माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक किरण डोळस व वरिष्ठ लिपिक जालिंदर कराळे यांनी परिश्रम घेतले.