डोंबिवली ( शंकर जाधव ) : एमआयडीसी विभागातील मिलापनगर मध्ये काही जेष्ठ महीला सायकल शिकण्याचे धडे गिरवित आहेत. हा उपक्रम सुवर्णा राणे ( 62 वर्षे ), सरोज विश्वामित्रे ( 75 वर्षे ) आणि हर्षल सरोदे ( 48 वर्षे ) या महिलांच्या माध्यमांतून होत आहे. या जेष्ठ महिलांना सायकलपटू गोल्ड मेडालिस्ट हर्षल सरोदे ही विनामूल्य सायकल शिकवीत असून यात लहान मुलीमुले ते वयाच्या 75 वर्षापर्यंत महिला सायकल शिकत आहेत.
सदर उपक्रम चालू करणाऱ्या महिलांना काही सायकली दान स्वरूपात मिळाल्या असून त्या त्यांनी दुरुस्ती करून घेतल्या आहेत. या उपक्रमासाठी अजून नवीन-जुन्या सायकल आणि हेल्मेट याची आवश्यकता असल्याने ज्यांना या उपक्रमासाठी मदत करायची आहे त्यांनी खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आतापर्यंत तीस पेक्षा जास्त जणांनी सायकल शिकून घेतल्या नंतर ते सर्व सायकल चालविण्यास तरबेज झाले आहेत. सुवर्णा राणे, सरोज विश्वामित्रे यांच्या बरोबर श्रीमती उज्वला कांबळे 67 वर्षे, स्मिता पाठक 66 वर्षे, कल्पना बोंडे 56 वर्षे, किशोरी कोलेकर 51 वर्षे, दीपा नाईक 43 वर्षे अशा अनेक महिलांनी आणि लहान मुलामुलींनी आतापर्यंत सायकल शिकून घेतल्या आहेत.
सदर उपक्रमामुळे व्यायामा बरोबर पर्यावरण आणि चांगले आरोग्य राखण्यात मदत होत आहे. सदर उपक्रमाचे सर्व थरातून कौतुक होत असून ज्या जेष्ठ महिलांना आणि लहान मुलांना यात सायकल शिकण्यासाठी सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुवर्णा राणे 9320450425 आणि हर्षल सरोदे 8424927311 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.