पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण; महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
मे ०१, २०२४
नाशिक, दिनांक १ मे, २०२४ : पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, सर्व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, महाराष्ट्र राज्याला फार मोठा ऐतिहासिक, क्रांतिकारी, सांस्कृतिक, सामाजिक, पुरोगामी वारसा लाभला असून तो आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मराठी असल्याचा अभिमान जागृत करते.
प्रारंभी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदि वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या महाराष्ट्र गीत व अन्य स्फूर्तीदायक गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 20 मे रोजी नाशिक जिल्ह्यात मतदान होत असून, प्रत्येक नाशिककराने मतदान करावे, असे आवाहन करत उपस्थितांना शपथ दिली.