उरण दि १० ( विठ्ठल ममताबादे ) : मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक १३ मे रोजी २०२४ आहे . यात पूणे जिल्हा व रायगड जिल्हयातील तालुक्यांचा समावेश आहे.निवडणूकीची तारीख जवळ आल्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. त्यातच मावळ लोकसभा मतदार संघातील उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील कोंढरीपाडा येथील ग्रामस्थांनी आपल्या आराध्य ग्रामदैवत श्री हनुमंताच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्याने केलेल्या गैरकृत्याबद्धल एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी त्या गुन्हेगाराला शासन होत नसल्याने लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
मागील गेल्या एक वर्षापासून आगरी कोंढरी ग्रामस्थ हे गावातील ग्रामदैवत श्री हनुमंताच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्याने केलेल्या गैरकृत्याबद्धल त्याला शासन व्हावे यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत परंतु काही शासकीय आणि राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगार हा गावात मोकाट फिरत आहे.आगरी कोंढरी पाड्यात असणाऱ्या श्री हनुमंताच्या मुर्तीची विटंबना हि दिनांक ६ में २०२३ रोजी गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील या समाजकंटकाने केली होती. सदर इसमावर उरण येथील पोलिस ठाण्यात त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत रितसर एफआयआर देखील नोंदविण्यात आलेली आहे. संपूर्ण गावकऱ्यांना कायद्यावर व शासकीय पोलीस यंत्रणेनेवर विश्वास होता की ग्रामदेवतेच्या झालेल्या विटंबनेला शासनातर्फे अथवा न्यायालया मार्फत योग्य ती फौजदारी कारवाई होईल अशी अपेक्षा नव्हे तर आशा होती, परंतु पोकळ शासकीय आश्वासनाद्वारे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ग्रामदेवतेच्या विटंबनेबाबत गुन्हेगारावर कोणतीही कारवाई न होता न्याय मिळण्यास दिरंगाई होत असल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये असंतोष व असमाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कारणास्तव सर्व ग्रामस्थांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.