नवीमुंबई, दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी बुधवार, दि.26 जून 2024 रोजी मतदान होणार असल्याची अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली.
भारत निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानूसार शुक्रवार, दिनांक 31 मे 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक 07 जून 2024 रोजी दुपारी 3.00 वाजे पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवार, दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वाजे पासून केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवार, दिनांक 12 जून 2024 दुपारी 3.00 वाजे पर्यंत राहील. बुधवार, दिनांक. 26 जून 2024 रोजी सकाळी 8.00 ते सायं 4.00 या वेळेत या मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार, दिनांक 01 जुलै 2024 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार दिनांक. 05 जुलै 2024 रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.
मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदार संघ व कोकण विभाग पदवीधर मतदार संघ या तीनही मतदार संघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहतील. मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ या दोन मतदारसंघासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच कोकण विभाग पदवीधर मतदार संघाकरिता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अशी माहिती कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी यावेळी दिली.
आचारसहिंतेबाबत माहिती देताना उपआयुक्त अमोल यादव म्हणाले की, कोकण विभागात जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे, या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.
तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात आले असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष/लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येत आहे.
विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 022 -27571516 असा आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. मुंबईशहर -022- 22664232, 8657106273, मुंबई उपनगर- 022 - 69403344, 08104729077, ठाणे- 022 – 25301740, 09372338827, पालघर – 02525 – 299353, 08237978873, रायगड- 02141 -222118, 8275152363, रत्नागिरी – 02352 – 222233, 07057222233, सिंधुदुर्ग- 02362 – 228847, 7498067835 असा आहे.