डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना ठाकरे गटातील डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी 30 एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शनिवार 4 मे रोजी ठाकरे गटातील कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या सर्वांना शिवसेना ठाकरे गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत आहेत.
तर प्रकाश म्हात्रे म्हणाले, शिवसेनेत ४० वर्षापासून जनतेची सेवा करत आहे. आता ठाकरे गटात जे स्थानिक पातळीवर निर्णय घेताना मला विश्वासात घेतले जात नव्हते.दरेकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना मला कळविलेही नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे.
यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे उबाठा गटात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.