एका गुन्ह्यात आरोपी अटकेत, दुसऱ्या गुन्हातील आरोपी रुग्णालयात
डोंबिवली : डोंबिवलीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात एका एका गुन्ह्यात मारेकरी अटकेत, दुसऱ्या गुन्हातील आरोप रुग्णालयात दाखल आहे. एका घटनेत पती पत्नीचे भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्याचीच संतापलेल्या पतीने हत्या केली तर दुसऱ्या घटनेत भाऊजयी आणि भावाचे भांडण सुरू असताना भांडण सोडण्यास गेलेल्या दिराची भाऊजयीने हत्या केल्याची घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्याची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते. रविवार 5 तारखेला दुपारच्या दरम्यान या दोघांमध्ये भांडण सुरु झाले. घरात भांडण सुरु असताना संदीप यांचा भाऊ सागरही होता. सागरने हा वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने भोसकले .या हल्ल्यात सागरचा मृत्यू झाला .याच दरम्यान संगीताने देखील स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. संगीतावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संगीता विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात उसरघर येथील एका बांधकामाच्या साइटवर ताहियाद अली,सुफीया अली हे दोघे पती-पत्नी मजुरीचे काम करत होते. या दोघांमध्ये सातत भांडण होत असे .रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणि सोफिया या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले .याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अली हा वाद सोडवण्यासाठी आला. संतापलेल्या ताहियादने जोहरला लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ताहियात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे