डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांची जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सभा रविवार ९ जून रोजी कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सभागृहात संपन्न झाली. या संयुक्त सभेला आर्चरी, ॲथलेटिक्स, आट्या पाट्या, बाॅल बॅडमिंटन, कबड्डी, टेनिक्वाईट, वुशू, हॅन्डबाॅल, ज्युदो, फुटबॉल, बाॅक्सिंग, जिमनॅस्टिक, रोलबाॅल, कुस्तीगीर, टेनिस बॉल क्रिकेट, फेन्सिंग, साॅफ्टबाॅल, स्क्वॅश रॅकेट, रायफल शूटिंग, कॅरम, लंगडी, तायक्वांदो, स्केटिंग या एकविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांनी एकत्र येवून, 'ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघ ' हे संस्थेचे नाव निश्चित केले. महासंघाचे अध्यक्ष म्हणून जगन्नाथ (आप्पा) सखाराम शिंदे यांची सर्वानुमते निवड केली.
सभेच्या सुरुवातीला जिमनॅस्टिक असोसिएशन ठाणे अध्यक्ष मुकुंद भोईर यांनी पुष्पगुच्छ देवून जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचे स्वागत केले. जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. याप्रसंगी वाशी इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक व आट्या पाट्या राष्ट्रीय खेळाडू अनिल घुगे यांची महाराष्ट्र शासनाचे क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पूर्वा मॅथ्यू लोकरे आणि आशुतोष लोकरे यांची ज्युदो या खेळात एन्.आय.एस्. मध्ये भारतात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल कौतुक केले.या प्रसंगी ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी खेळाडू विकासाच्या विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. भारताची लोकसंख्या आता जगात प्रथम क्रमांकावर जात आहे. चीनची लोकसंख्या व त्यांची ऑलिंपिक स्पर्धेतील पदके विचारात घेतली तर आपण मागे का आहोत? आपल्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऑलिंपिक पदक विजेते तयार झाले पाहिजेत. क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू नये. ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाचे कार्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना मार्गदर्शक राहिले पाहिजे. मी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील किमान एका तरी खेळाडूने ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले तो दिवस माझा आनंदाचा!
खेळाडू हा केंद्रबिंदू मानून ठाणे जिल्ह्यातील क्रीडा विकास होण्यासाठी प्रयत्न करणे व क्रीडांगणावरील पायाभूत सुविधा सुधारणे आवश्यक आहे, असे कल्याण तालुका ज्युदो असोसिएशन खजिनदार लिना मॅथ्यू यांनी यावेळी सांगितले. प्राविण्य प्राप्त व सहभागी खेळाडूंना ५% आरक्षण मिळावे असे मत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएश नसचिव मालोजी भोसले यांनी व्यक्त केले. कुस्तीगीरांना दर्जेदार मॅट महानगरपालिकांनी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असे कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संघ सचिव सुभाष ढोणे यांनी सूचविले. ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटना एकत्र येण्याचा इतिहास कल्याणच्या ऐतिहासिक नगरीत घडला, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे ठाणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशन सचिव अविनाश ओंबासे यांनी सांगितले. ॲथलेटिक्स, हाॅकी व फुटबॉल या सारख्या खेळांना मोठ्या क्रीडांगणाची आवश्यकता आहे असे ठाणे जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशन अशोक आहे यांनी मांडले.
महासंघ नोंदणीकृत करण्यासाठी सर्वानुमते घटना समितीमध्ये श्रीराम पाटील - अध्यक्ष (ठाणे जिल्हा रायफल असोसिएशन), लक्ष्मण इंगळे - कार्यवाह (ठाणे जिल्हा आर्चरी असोसिएशन), प्रताप पगार - कार्यवाह (ठाणे जिल्हा रोलबाॅल असोसिएशन), मालोजी भोसले - सचिव (ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), लिना मॅथ्यू - खजिनदार (कल्याण तालुका ज्युदो असोसिएशन), सुभाष ढोणे - सचिव (कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संघ), अविनाश ओंबासे - सचिव (ठाणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशन) यांची निवड करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन समन्वयक या नात्याने अंकुर आहेर यांनी केले.