Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

ठाणे मनपाच्या पूर जोखीम व्‍यवस्‍थापन आराखडयाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन.


ठाणे २२ जून ( संतोष पडवळ - प्रतिनिधी ) : ठाणे महापालिका क्षेत्रातील पूर जोखीम व्यवस्‍थापनासाठी तयार करण्यात आलेल्या ठाणे शहर कृती आराखडा २०२४ चे प्रकाशन शनिवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. हा आराखडा राज्य सरकार आणि कौन्सिल ऑन एनर्जी, एन्‍व्‍हायरोन्‍मेंट अँड वॉटर (सीईईडब्‍ल्‍यू) या आघाडीच्‍या थिंक टँकच्‍या सहयोगाने विकसित करण्‍यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्‍त भागांना प्राधान्‍य देऊन पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहणे आणि जलद प्रतिसाद देण्‍यासाठी यंत्रणेला सुसज्ज करण्याची दिशा मिळणे हा या कृती आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे.

पूर जोखीम व्‍यवस्‍थापनासाठी 'सीईईडब्‍ल्‍यू' या संस्थेने तयार केलेला ठाणे शहर कृती आराखडा २०२४ हा सर्वसमावेशक आहे. त्यासाठी संस्थेने अतिशय मेहनत घेतली आहे. अतिरित्त मुख्य सचिव (गृह) आणि ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. त्यातून तयार झालेल्या या कृती आराखड्यामुळे ठाणे महापालिकेच्या यंत्रणेला सुप्रशासनासाठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन या प्रकाशन कार्यक्रमात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. यावेळी, नागरिकांना या कृती आराखड्याची माहिती व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचेही प्रकाशन करण्यात आले.

ठाणे महापालिका क्षेत्राचा विकास होत असताना नैसर्गिक नाल्यांची स्थिती आमूलाग्र बदलली आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने विचार करून भूमिगत मल:निसारण वाहिन्यांचे जाळे उभारण्याचे मोठे आव्हान आता महापालिकेसमोर उभे आहे. त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी 'सीईईडब्‍ल्‍यू' या संस्थेने महापालिकेसाठी तयार केलेला हा कृती आराखडा दिशादर्शक म्हणून काम करेल. नवीन प्रकल्प करताना, डीपीची अमलबजाबणी करताना या कृती आराखड्यातील मुद्दे विचारात घेऊनच निर्णय घेतले जातील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

या आराखड्यामुळे पालिकेची जबाबदारी वाढली आहे. आता हा आराखडा नागरिकापर्यंत घेऊन जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा उपक्रम महापालिका करेल, असेही आयुक्त राव म्हणाले. तसेच, उष्णतेचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यापाठोपाठ हा पूर जोखीम व्‍यवस्‍थापन आराखडा तयार झाला आहे. आता पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही यावेळी आयुक्त राव यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |