डोंबिवली ( शंकर जाधव ) : शहरातील पूल दुरुस्ती, रस्ते अशी कामे सुरु असताना ठेकेदार काम व्यवस्थित करत आहे कि नाहीं याकडे लक्ष ठेवण्यासाठी संबंधित विभागतील अभियंता जागेवर असतो. मात्र डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराजवळील पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेपुलाकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने हा पूल धडपडणारा पूल म्हणून बोलला जात आहे.
पुलाच्या पायऱ्यांना लावलेल्या लोखडी पट्ट्या ह्या एक ते दोन इंच वर लावल्याने नागरिकांना पायऱ्या चढताना व उतरताना जीव मुठीत धरून जावे लागते. एखादा नागरिक या पुलावरून जात असताना पडून फॅक्चर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत निदान पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यत तरी पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी केली आहे. तर काही नागरिकांनी हा पूल बंद करावा कारण कोणी पडले तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार नाही अशा शब्दात प्रशासनाची कानउघडणी केली आहे.
पुलावरून शाळकरी विद्यार्थ्यांचे जाणे येणे होत असते. या मुलांनाही पुलावरून जाताना त्रास होत असल्याने मुलेही पुलाच्या कडेला असलेला दांडा पकडून जात असल्याचे दिसते. येथील पुलाचे काम करणाऱ्या व पुलाच्या पायऱ्यांच्या वर लोखंडी पट्टी लावणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनाने जाब विचारणे आवश्यक आहे. तसेच प्रशाससनाने त्वरित या पुलावरील वर लावलेल्या पट्ट्या काढून टाकाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आले.