डोंबिवली ( शंकर जाधव ) : " सावध सरकारचा संभ्रमित अर्थसंकल्प " अशा शब्दात २०२३-२४ सालासाठी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल असे विवेचन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक चन्द्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२४' या विषयावरील भाषणात टिळक यांनी हे मत व्यक्त केले.
अनेक महत्त्वाच्या घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात न करता अर्थसंकल्पाबाहेर करण्याची मोदी सरकारची गेल्या १० वर्षातील कार्यशैली राहीली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडातही ही शैली सुरू राहिली आहे. तिसऱ्या कालखंडात सत्तारूढ होणे आणि त्यातील पहिला अर्थसंकल्प सादर होणे यात अवघ्या ६-७ आठवड्याचे अंतर असूनही संरक्षण क्षेत्रातील वस्तू व सेवा यांची निर्यात आणि रेल्वे विस्तार याबाबतचे निर्णय अर्थसंकल्पात न येता आधीच जाहीर झाले. मात्र त्यासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने कृती व उक्ती यात फारसा फरक पडणार नाही अशी आशा टिळक यांनी व्यक्त केली. या दोन्ही निर्णयात असणारा राष्ट्रीय व जागतिक घटना आणि घटक यांची अतिशय अभ्यासपूर्ण व सविस्तर चर्चा टिळकांनी याप्रसंगी केली.
महाभारतातील पितामह भीष्म आणि महर्षी वेदव्यास यांच्या संवादाचा ध्रुवपदा सारखा उपयोग संपूर्ण भाषणभर करत ANGEL टॅक्स , बाँड मार्केट , अल्पकालीन भांडवली नफ्यावरील कर, दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कर , नवीन व जुनी आयकर पद्धत याबाबतच्या या अर्थसंकल्पातील तरतूदी आणि त्यांचे संभाव्य परिणाम याची अनेक उदाहरणे देत टिळकांनी त्यांच्या भाषणात केलेली सखोल चर्चा व सर्वसामान्य नागरिकांनी करावयाच्या कृतीचे नेमके मार्गदर्शन हे या विवेचनाचा खरा मर्म होते.
शेअरबाजार , सोने , घर हे गुंतवणूकीचे तीन वेगवेगळे आयाम कर - रचना आणि इतर काही गोष्टी या निकषावर अगदीं एका पातळीवर जरी नसले तरी निदान तुलनात्मक एकसारखे करण्याचा विचार या अर्थसंकल्पात असावा अशी शंका येते. डिजिटल रुपयाच्या सहाय्याने आणि वाढत्या डिजिटल पेमेंटमुळे चलन बाजारही त्या दिशेने नेला जातो आहे का अशी ओघवती चर्चा या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींच्या निमित्ताने याप्रसंगी टिळक यांनी केली.
अर्थसंकल्पाचे अर्थकारण , त्याचे राजकारण , यातून साध्य करावयाचे समाजकारण , विविध राज्यांना मिळालेला निधी अशा अनेक मुद्द्यांची समर्पक चर्चा श्रोत्यांनी दिलेल्या अतिशय उत्तम प्रतिसादाच्या य कार्यक्रमात केले.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाची गेल्या सलग ३८ वर्षांची श्री चन्द्रशेखर टिळक यांची परंपरा अत्यंत उत्तम रित्या याही वर्षी प्रभावीपणे पार पडली. चन्द्रशेखरजी टिळक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या डोंबिवलीकरांचे टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अध्यक्ष सचिन आंबेकर यांनी आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीचे अध्यक्ष संजय मांडेकर त्यांनी आभार मानले.