ठाणे : शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगढमधील अफताब ढेबर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
यातील चीन आणि दुबईचाही संबंध उघड झाला असून, ७७९ मोबाइल सिमकार्डसह २३ मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले. ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी सक्रिय टोळ्यांकडून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशन साइट्स तयार करून त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचं आमिष दाखवलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केलं जातं. अशा गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यामधील रक्कम ऑनलाइन वळती करून फसवणूक केली जाते.
ठाण्यातील सायबर कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप सरफरे यांना अशा १६ गुन्ह्यांचा एकत्रित तपास करत असताना आरोपींनी फसवणुकीसाठी पीडितांसोबत व्हॉट्सॲप चॅटींगद्वारे संपर्क केलेल्या मोबाइल क्रमांकाच्या सीडीआर आणि व्हॉट्सॲप मेसेजिंगची माहिती मिळवली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.