ठाणे, दि. 2 - अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महसूल, पोलीस विभागाने संयुक्तपणे पडघा येथील अनधिकृत हॉटेल, ढाबा व दुकानांवर कारवाई केली व अनधिकृत बांधकामे नष्ट केली.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसिलदार अभिजित खोले यांच्या पुढाकाराने काल ही कारवाई करण्यात आली.
यावेळी मौजे सवाद येथील अनधिकृत दुकाने, मौजे बापगाव येथील संदीप ढाबा, द बॅकयार्ड आणि जय मल्हार ढाबा, मौजे बोरिवली तर्फे सोनाळे येथील यू पी हॉटेल आदींवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करून अनधिकृत बांधकामे नष्ट करण्यात आली.
या कारवाईत भिवंडी उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पडघा पोलीस सहभागी झाले होते, अशी माहिती भिवंडी तहसिलदार अभिजित खोले यांनी दिली आहे.