वानवडी : कौशल्य विकासात राज्यानं अग्रेसर राहावं, यादृष्टीनं राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे, असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सांगितलं. आषाढी वारी सोहळ्याचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कौशल्य विकास दिंडीचा आज त्यांच्य हस्ते वानवडी इथं प्रारंभ झाला, त्यावेळी ते दूरदर्शन प्रतिनिधीशी बोलत होते.
युवावर्गानं कौशल्य आत्मसात करावं, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर टप्पा टप्प्यानं कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येतील, असं लोढा म्हणाले. कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती आषाढवारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना व्हावी, हा या कौशल्य विकास दिंडीचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. या दिंडीत पुणे परिसरातल्या शासकीय तसंच खाजगी प्रशिक्षण संस्था, सेवाभावी संस्था तसंच स्टर्टअप उपक्रमाचे लाभार्थी, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
मंत्री लोढा यांनी यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेऊन वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन विठूनामाचा गजर केला तसंच काही अंतर पायी वारी केली.