डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील यशस्वी उद्योजिका छाया भास्कर हट्टंगडी यांचे मंगळवार २ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
जयराज टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटच्या त्या संचालिका होत्या.तीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांचे मोठे बंधू जयंत हटंगडी यांच्या मदतीने व सहकार्याने एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर, डोंबिवली (पश्चिम) येथे छोटासा गाळा घेऊन स्वतःचे सरकार मान्य जयराज टायपिंग आणि शॉर्ट अँड इन्स्टिट्यूटची स्थापना केली. या काळात असे काही उभारणे म्हणजे मोठे जिकरीचे व अविश्वासाचे काम होते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, परंतु त्या डगमगल्या नाहीत. एखादी स्त्री काय करू शकते या नारीशक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे त्या काळात त्यांनी उभारलेले सदर इन्स्टिट्यूट. स्वतःच्या आत्मविश्वासावर व त्यांच्या आईने व थोरल्या भावाने ठेवलेल्या विश्वासाला जागून अपार कष्ट व मेहनत करून जिद्दीने 35 वर्षाहून अधिक काळ सदर इन्स्टिट्यूट चालवून अल्पावधीतच नावारूपाला आणले. समाजातील अनेक मुला-मुलींना सरकारमान्य टायपिंग व शॉर्ट अँडचे उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वबळावर उभे राहण्यास मदत केली.त्यामुळे अनेक मुला-मुलींना सरकारी व खाजगी नोकरी मिळण्यास अडचण आली नाही.अनेकांचे या प्रशिक्षणाच्या बळावर सरकार मान्यता प्राप्त प्रमाणपत्राच्या आधारे लिपिक, लघुलेखिका, सेक्रेटरी अशा अनेक पदांवर नोकरीमध्ये प्रमोशन झाले.
छाया हट्टंगडी यांचा प्रेमळ व मनमिळावू स्वभाव तसेच, विद्यार्थ्यांना मृदू भाषेत समजावून सांगून शिकवण्याची पद्धती बरोबरच इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बनविलेले वेळापत्रक, मनमोकळे वातावरण, कॉलेज प्रमाणे साजरे होणारे अनेक डे, सहली या सर्व अनेक विविध उपक्रमांमुळे जयराज इन्स्टिट्यूटची ख्याती सर्वत्र पसरलेली होती. इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी रमून जाऊन प्रशिक्षण घेत असे. प्रत्येक विद्यार्थिनी बरोबर छाया हट्टंगडी यांनी मैत्रिणीचे नाते जोपासलेले होते. त्यामुळे इथे फक्त डोंबिवलीतीलच नव्हे तर डोंबिवली बाहेरील नागरिक व मुले मुली येऊन प्रशिक्षण घेत होते.या इन्स्टिट्यूट मध्येच छाया हट्टंगडी यांनी मैत्रिणीच्या सहाय्याने व त्यांचे थोरले बंधू जयंत हट्टंगडी यांच्या मदतीने काही काळ एस.टी. बुकिंगचे सेंटर सुरू करून अनेक नागरिकांना एस.टी. बसच्या ऑनलाइन तिकिटाची सेवा देण्याचे कार्य सुरू केले होते.
यावेळी सणासुदीला सुद्धा सदर इन्स्टिट्यूट ऑनलाइन एस.टी.बुकिंग करिता पहाटे लवकर उघडले जाऊन रात्री उशिरापर्यंत चालू ठेवून नागरिकांना टिकीटे देण्याचे कार्य चालू ठेवायचे.अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या कुटुंबातील नातलग, मैत्रिणी, शेजारी, इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थिनी या सर्वांना त्यांचे विवाह कार्य असो, आजारपण असो, आर्थिक अडचण असो अथवा इतर अनेक समस्या असो सर्वांना अनेक प्रकारे मोलाची मदत केली.त्यांना भरतकाम, शिवणकाम याची आवड असल्याने त्यांनी अनेक मुलींच्या विवाह कार्यात रुखवतासाठी अनेक वस्तू स्वतः बनवून दिलेल्या आहे.