Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नमुंमपा कर्मचा-यांना एनडीआरएफ मार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण


नवी मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी - कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, त्यामुळे नेहमी सतर्क राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कोणत्याही आपत्तीत एनडीआरएफ जवान ज्या समर्पित भावनेने नियोजनबध्द मदतकार्य करतात ते स्पृहनीय असल्याचे सांगत त्यांनी एनडीआरएफमार्फत आज मिळणारे प्रशिक्षण नवी मुंबईतील शहर आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीम. अनिता जवंजाळ, यशदाचे मुख्य प्रशिक्षक श्री. योगेश परदेशी तसेच एनडीआरएफचे निरीक्षक श्री. जालिंदर फुंडे उपस्थित होते.

पूर, भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सुनामी, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, वायू अथवा रासायनिक गळती, अपघात अशा आपत्तीच्या प्रसंगी एनडीआरएफ कशा प्रकारे कार्यवाही करते याची विस्तृत माहिती देत एनडीआरएफचे निरीक्षक श्री. जालिंदर फुंडे यांनी एनडीआरएफची मदत कुठे घेता येऊ शकते यावर भाष्य केले.

2005 च्या आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार आपत्तीबाबत कार्यवाही केली जात असल्याची माहिती देत त्यांनी विविध प्रकारच्या आपत्तींची व त्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारी व कार्यवाहीची सादरीकणाव्दारे माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींची बाबनिहाय माहिती देत आपत्तीआधी, आपत्तीप्रसंगी व आपत्तीनंतर करावयाच्या सुरक्षित कार्यवाहीविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच आपल्या सहका-यांसह प्रात्याक्षिके दाखविली.

आपत्तीप्रसंगी कोणतेही शासकीय मदतकार्य पोहचेपर्यंत घरातल्या टाकाऊ अशा साध्यासाध्या वस्तूंपासून आपत्तीप्रसंगी बचाव करणारे साहित्य सहजपणे बनवता येऊ शकते याबद्दलची माहिती त्यांनी दिली तसेच अशी साहित्य प्रदर्शितही केली. यावेळी आपत्तीप्रसंगी प्राथमिक स्वरुपात आरंभी करावयाच्या मदतकार्याची प्रात्यक्षिकेही एनडीआरएफ जवानांनी सादर केली.

नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता मित्र, सुरक्षारक्षक तसेच शासनाच्या महसूल विभागातील कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या माध्यमातून एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमीकरणासाठी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |